देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक मूल्यमापनाच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा कणा समजल्या जाणाऱ्या 'कोअर सेक्टर'मध्ये आता लोहखनिज उद्योगाचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील मुख्य उद्योगांची संख्या आता आठवरून नऊ झाली असून, यामुळे औद्योगिक उत्पादनाचे अधिक अचूक आणि व्यापक मूल्यांकन करणे शक्य होणार आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बदलासह कोअर इंडस्ट्रीज इंडेक्स मालिकेचे आधार वर्ष देखील सुधारित करण्यात आले आहे. आता नवीन मालिकेसाठी '२०२२-२३' हे आधार वर्ष असणार आहे. ही नवी व्यवस्था २० जुलैपासून देशभरात लागू होईल आणि ती सध्या वापरात असलेल्या २०११-१२ या जुन्या आधार वर्षाच्या मालिकेची जागा घेईल. यापूर्वी देशाच्या कोअर सेक्टरमध्ये प्रामुख्याने आठ उद्योगांचा समावेश होता. यामध्ये कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम रिफायनरी, कोळसा, वीज, सिमेंट, खत, आणि तयार पोलाद आता या यादीत नव्याने लोहखनिज उद्योगाची भर पडली आहे.
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहखनिज हा पोलाद उद्योगासह इतर अनेक महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्रांसाठी अत्यंत मूलभूत कच्चा माल आहे. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्राचा कोअर सेक्टरमध्ये समावेश केल्याने भारताच्या औद्योगिक विकासाचे आणि आर्थिक स्थितीचे अधिक स्पष्ट आणि वास्तववादी चित्र जगासमोर येण्यास मदत होईल.