पुणे : आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार पुण्यातील बांधकाम व्यवसायिक असलेले खलील शेख यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खालील शेख यांनी कर्जबाजारी झाल्यानंतर आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ देखील तयार केला असल्याचं सांगितले जाते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , खालील शेख हे बांधकाम व्यावसायिक होते. पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतर चार भागीदार यांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची एक कंपनी स्थापन केली होती. दरम्यान पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाची जमीन विकत घेण्यात आली होती. या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभा करण्याचे नियोजन होते. यासाठी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. दरम्यान बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. बांधकाम अडकल्याने आणि कर्जबाजारी होऊन आर्थिक विवंचनेत अडकल्याने खालील शेख यांनी गुलटेकडी येथे त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती त्यांच्या व्हिडिओच्या आधारे मिळाली आहे.
या व्हिडीओ मध्ये त्यांनी आपल्या व्यावसायिक भागीदारांवर अनेक गंभीर आरोप केल्याचे देखील समजते आहे.