आज कंटाळा आलाय बुवा ! असं तुम्हालाही होतं का? सामान्य गोष्ट आहे. रोज रोज तेच रुटीन यामुळे मनावर एक प्रकारचा ताण येतो. काहीतरी बदल करावा वाटतो. पण रोजच्या जबाबदाऱ्यांसमोर मोठ्या गोष्टी या शक्य नसतात. आता अगदीच काहीजण म्हणतील की, एखादी ट्रिप काढावी, एखादी चक्कर लांब वर मारून यावी ,बाहेर जेवायला जावं आणि बरंच काही. पण तुम्हाला काही सायकॉलॉजिकल टिप्स आज देते. ज्या वापरून कदाचित तुम्हाला रोजच्या त्याच त्याच रुटींग मधून बाहेर पडल्यासारखे वाटेल.
तर काय होतं नोकरदार वर्गासाठी सकाळी उठायचं-आवरायचं- नोकरीला जायचं- घरी यायचं -थोडा वेळ घरात आणि पुन्हा झोप किंवा गृहिणींसाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातील लहान मोठे सगळ्यांची काळजी -घरकाम यातून मनावर एक प्रकारचा ताण येतो. मग अशावेळी काय करायचं ? तर या लहान सहान गोष्टी करून पहा.
१. जेव्हा मनावर खूप विनाकारण दडपण येईल मनातले अति विचार थांबता थांबवता येणार नाहीत तेव्हा सगळी हातातली काम बाजूला ठेवा आणि गरम पाण्याने अंघोळ करा. आता तुम्हाला वाटेल की याने नेमकं काय होणार ? पण याने होतं असं की मन स्थिर होण्यासाठी मदत मिळेल. डोक्यातले विचार हळूहळू शांत होतील. गरम पाण्यामुळे शरीर थोडे हलके होते. त्यामुळे तुमचं जे काही काम असेल ते करण्यासाठी बौद्धिक स्थिरता येईल .म्हणून एकदा हा प्रयत्न करून तर पहा.
२. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि अचानक कामामुळे किंवा कोणत्याही कारणाने तुम्हाला प्रचंड दडपण आलं तर हातातली सगळी काम सोडा. खुर्चीवर शांत डोळे मिटून बसा आणि डीप ब्रीदिंग करा. श्वासाकडं लक्ष द्या. मोजून दहा वेळा तुम्हाला मोठा खोल श्वास घ्यायचा आहे. यामुळे मन चलबिचल झालेले स्थिर होते. आणि कामांमध्ये निर्णय घ्यायला सोपे जाऊ शकेल. एकदा करून तर पहा.
आता अगदीच लहान गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या मनावरची मरगळ घालवण्यासाठी साथ देतील...
३. आवडतात म्हणून रोज रोज तेच तेच कपडे घालणं बंद करा. स्वतःवर वर्कआउट करा. तुम्ही छान दिसणं लोकांसाठी नाही तर तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जास्त गरजेच आहे. एकदा ट्राय करून पहा. एखाद्या दिवशी स्वतःला विशेष वेळ द्या. काहीतरी वेगळं घाला. नेहमीचे कलर सोडून वेगळे कलर, ड्रेसचे प्रकार, मेकअप, फुटवेअर ट्राय करा. अर्थात हे सगळं काही कम्फर्टेबलच असायला हवं. पण त्यादिवशी तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला जास्त असल्याचे जाणवेल
४. आता सगळ्यात जालीम उपाय. अर्थात तुम्ही जर संभाषण क्षेत्रात असाल तर हे शक्य नाही पण जितके जमेल तितके मौन धरा. चेहरा आनंदीच पण शांत रहा! थोडं लोकांना ऑब्सर्व्ह करा. स्वतःच्या मनातली चलबीचल, गोंधळ हा सातत्याने स्वतःच ऐकत राहण्यापेक्षा लोक काय म्हणतात हे अधिक ऐकायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही लोकांना ऐकायला सुरुवात कराल तेव्हा तुमचा समजूतदारपणा इतरांबद्दलच नाही तर स्वतःच्या भावनांबद्दल देखील वाढेल. स्वतःची मानसिक ताकद ओळखा आणि वाढवा.
५. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आजच्या काळात लोक करतात ते म्हणजे सोशल मीडियावर रिल स्क्रोल करत बसणे. एकदा स्वतः ला तपासा की आपण मोबाईलवर रील स्क्रोल करण्यात नेमका किती वेळ घालवतोय. काही रिल या नक्कीच इन्फॉर्मटिव्ह असतात. पण हे देखील एक व्यसनच आहे. त्यामुळे सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी दिवसभरातला काही वेळ हा तुम्ही ठरवा ना की सोशल मीडियाला ठरू द्या की तुम्ही किती वेळ सोशल मीडियावर घालवायचा.
६. आणि एक शेवटचा छान हलकाफुलका उपाय. आजकाल असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर तुम्ही बसल्या जागी एखादा नवीन कोर्स करू शकाल. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ,गृहिणी असाल, वयस्कर, रिटायर्ड लाईफ जगत असाल तरीही ऑनलाइन जमत असेल तर ऑफलाईन काहीतरी नवीन स्किल शिका. ज्यामध्ये वाद्य वाजवणे ,नृत्यकला ,योगा किंवा तुमच्या क्षेत्रातील एखादा अपडेटेड कोर्स काही करा. पण काहीतरी नवीन करत रहा म्हणजे त्याच त्याच रुटीनचा कंटाळा येणार नाही.