बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे तीन टर्म आमदार आदरणीय रामभाऊ गेणबा मोझे यांचे आजारपणामुळे दुःखद निधन झाले.
रामभाऊ मोझे हे वडिलांनंतर नगरसेवक झाले, स्थायी समिती अध्यक्ष झाले. नंतर १९८५ ते १९९९ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या जीवनात सामाजिक उत्तरदायीत्वाला त्यांनी महत्त्व दिले.
मुठा नदीच्या डाव्या बाजूच्या पुणे शहरातील भागात मुठा डाव्या कालव्यात पाईपलाईन टाकून शुद्धीकरण कर्वेनगर (कोपरे पुनर्वसन गावठाण )व खडकी येथे म न पा चे कमिशनर रमानाथ झा असताना प्रस्तावित केली व आज ती चालू आहे. धरण कालवा, शहरातील राखीव जागा, योजना कशी करायची याचा अभ्यास करून मांडणी केल्याने कमिशनर झा देखील आश्चर्यचकित झाले होते.
बालेवाडी बाणेर ग्रामपंचायत असताना पहिल्यांदा पुणे म न पा ची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली.औंधच्या मुळा नदीवरील नवीन पूलाचे आर्थिक नियोजन व मंजुरी केली.
वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 14 गावांसाठी 36 रुपये निधी ( राज्याला आलेल्या निधीतून जवळपास 12 टक्के ) मंजूर करून सुरू केली. विशेष म्हणजे ही कामे मतदार संघाच्या बाहेरील भागात केली. त्यांच्याकडे येणारी व्यक्ती जे काम घेऊन येईल त्याला प्राधान्य दिले. नातेवाईक, मित्र परिवार यांच्या कामात त्यांनी सहभाग घेऊन मदत केली.
म न पा कर्मचारी यांच्यासाठी सुमारे 500 फ्लॅट उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय जागा विश्रांतवाडी येथे मंजूर करून राम सहकारी संस्था स्थापन केली. तत्कालीन नामांकित बिल्डर अतुर संगताणी यांच्याकडून बांधकाम करून घेतले.
वडील स्वातंत्र्य सैनिक गेणबा मोझे यांचे नावाने बालेवाडी, चर्होली, वडगाव शेरी, येरवडा येथे शैक्षणिक संस्था सुरू केल्या. संस्थेतून 10 वी,12 वी बोर्डात येणाऱ्या विद्यार्थी यांच्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून 1 लाख रुपये बक्षीस दिले. मुले निघून जातात परंतु शिक्षक कायम असतात व ते विद्यार्थी घडवतात हा त्यांचा विचार व विश्वास होता. अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याला पुणे शहराने आणि राजकीय वर्तुळाने गमावल्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.