जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दोन्ही पालख्या पुण्यामध्ये लवकर दाखल झाल्या. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस देखील आज पालखीच्या आगमनासाठी जणू काही थांबला होता. अतिशय जल्लोषाच्या वातावरणात पुण्यात पालखी सोहळा सुरू झाला आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी निवडूंग्या विठोबा मंदिरात मुक्काम करणार असून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्काम करणार आहे. दोन्ही दिवस भाविकांना पालखीचं आणि पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. आज रात्रीपासूनच दोन्ही मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठीच्या रांगा लागायला सुरुवात होईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही मंदिरांच्या जवळ मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. स्त्रियांची रांग आणि पुरुषांची रांग वेगळी केली असून प्रत्येकाला नीट दर्शन घेता येईल यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
11 तारखेला पहाटे दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ होतील. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर मार्गे दिवेघाटातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ होईल. संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरमधून पुढे बारामतीच्या दिशेने मार्गस्थ होईल.