मुंबई : डोंबिवलीमध्ये एका खाजगी रुग्णालयात आज मोठा धक्कादायक प्रकार घडला. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार केले जावे असं रुग्णांच्या नातेवाईकांना सातत्याने सांगितलं जात होतं. परंतु पावसामुळे ते शक्य नाही, असे सांगत डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सुरू असलेल संभाषण पोहोचलं ते थेट नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यापर्यंत आणि त्यानंतर म्हात्रे यांनी थेट रुग्णालयात येऊन डॉक्टरांवर अरेरावीची भाषा करून धुडगूस घातला आहे.
याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार साधना कारंडे यांच्या मोठ्या मुलीला बाळंतपणासाठी या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आणण्यात आले होते. यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला आणि सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी रुग्णाने डॉक्टरांना विनंती केली की, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल आहे. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला वेळ लागेल. माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचं सांगून तिची प्रसूती याच रुग्णालयात करा अशी विनंती रुग्णाच्या नातेवाईकांनी केली होती. परंतु डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला आणि दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असं सांगत होते. त्यानंतर या नातेवाईकाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन करून परिस्थिती कळवली असता ते स्वतः रुग्णालयामध्ये आले.
रमेश म्हात्रे हे खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 'माझा फोन का उचलला नाही'? असे म्हणून त्यांनी आपल्या साथीदारांसह कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. महिला डॉक्टरला धक्काबुक्की करून दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सीसीटीव्हीमध्ये देखील हा प्रकार कैद झाला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होतोय.
यावर आता नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. रमेश म्हात्रे म्हणाले की, " जी मारहाण झाली याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. मी ठासून सांगतो मी महिला डॉक्टरांवरती हात उचलला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसते ते कॅमेरा अँगलने येत असेल. मी तिला ती बोलतो कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचं लग्न झालंय की नाही हे देखील मला माहिती नाही.आम्ही बोलत असताना सतत कानाला फोन लावून ती बोलत होती. आमची तक्रार ऐकत नव्हती म्हणून मी हातावर फटका मारला, असं नगरसेवक मात्र म्हणाले आहेत. त्याचबरोबर आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आम्ही महिलांवरती हात उचलला नाही आणि यापुढेही उचलणार नाही. जी घटना घडली आहे ती आस्थापनाच्या कमतरतेमुळे आणि ती व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी मला बोलावलं. त्या लोकांनी माझा फोन घेतला नाही. घटनेची गंभीरता ओळखून मी त्या ठिकाणी गेलो. असं रमेश म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
दरम्यान याबाबत मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडताना म्हटले आहे की, " रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल...! असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.