मुंबई : मुंबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे. मुंबईतील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजभवनात राज्यपालांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवान कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मलबार हिल परिसरात असलेल्या राजभवनात राज्यपालांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवान कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःच्याच सर्विस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राजभवनामध्ये लोकभवन येथे कार्यरत असताना त्यांनी स्वतःच्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरामध्ये असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. कौस्तुभ सांगळे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे कौस्तुभ सांगळे हे मूळचे नाशिकचे होते. कौटुंबिक वादातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते आहे. अद्याप अधिकृत माहिती नाही. तसेच त्यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी देखील आढळली नसल्याकारणाने आता मलबार हिल पोलीस पथक अधिक तपास करत आहे.