इंद्रायणीच्या पुराचा पालखी सोहळ्याला फटका...! सोहळ्यावर निर्बंध, केवळ मान्यवर व दिंडी प्रतिनिधींनाच मिळणार प्रवेश... - टॉप न्यूज मराठी

आळंदी : इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे. यात श्रींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 1 ते 25 तसेच रथामागील दिंडी क्रमांक 1 ते 20 मधील प्रत्येक दिंडीतील 10 वारकरी, दिंडीप्रमुख, मानकरी सेवेकरी, प्रतिष्ठित व्यक्ती आदी मिळून सुमारे 900 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. 

याशिवाय खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक आणि पोलीस अशा एकूण सुमारे 1960 जणांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी अनुचित घटना देखील घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.