मुंबई : पुणे मुंबई वाहतूक पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान मिसिंग लिंकच्या खंडाळा एक्झिट जवळ आज सहा जुलैला पहाटे तीनच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे आता वाहतूक पूर्ववत केव्हा सुरू होणार असा सवाल नागरिकांमधून होत असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येथील कामकाज आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सहा जुलैला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. कंट्रोल सेंटरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक बंद केली. वेळेत निर्णय घेतला गेल्यामुळे जीवित हानी टळली आहे. पाणी आणि दगड मोठ्या प्रमाणात आल्यामुळे टनेलचा बीम खाली आला आहे. बाकी टनेलच्या स्ट्रक्चरला कुठेही धोका नाही. तरीही आयआयटी कडून त्याची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्याकडून पुढच्या कार्यवाहीबाबत सल्ला घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणातील पाऊस आणि दगडामुळे टनेलचा पिलर कोसळला, त्यात कोठेही टेक्निकल प्रॉब्लेम आलेला नाही किंवा मटेरियल दुय्यम प्रतीचा वापरलं आहे असं काही नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या वरचा लेयर उखडला आहे. तो देखील पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्त करून घेऊ असं शिवेंद्र सिंह राजे भोसले म्हणाले आहेत.
वाहतूक पूर्ववत केव्हापर्यंत होऊ शकते याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, " बांधकाम मंत्री म्हणून मी आदेश देण्यापेक्षा निर्णय यंत्रणेला घेण्याची मुभा दिली आहे. कारण पोलीस ट्रॅफिक विभागाला या ठिकाणी काय होऊ शकतो याचा अंदाज आहे. त्यामुळे निर्णयाची मोकळीक दिली गेली आहे. कमीत कमी दोन लेन या ठिकाणाच्या सुरू होतील. कोसळलेली दरड तीन तासात हटवून स्वच्छतेचे काम पूर्ण होईल त्यानंतर परिस्थिती बघून कमीत कमी दोन लेन सुरू करण्याचा निर्णय पोलीस यंत्रणा घेईल असं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या भागात अतिवृष्टी होते आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता राज्य प्रशासनाकडून सातत्याने आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येते आहे.