पुणे : महाराष्ट्रमध्ये पावसाने आता बळी घ्यायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता तोच पाऊस जीवघेणा ठरतोय. मावळमध्ये आज सहा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दरड कोसळून संपूर्ण कुटुंब मलब्याखाली अडकले. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर युद्ध पातळीवर काम सुरू झाले. या कुटुंबाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु प्रयत्नांना यश आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास डोंगरकड्यावरून दरड कोसळल. ही दरड थेट एका घरावर कोसळली आणि यामध्ये हे घर क्षणार्धात मलब्याखाली दाबले गेले. प्रशासनाला तत्परतेने माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी तातडीने मदत मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. महसूल विभाग, पोलीस स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर स्वयंसेवकांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. हा मलबा हलण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होतं. पण या कुटुंबावर मात्र काळाने घाला घातलाच. या घटनेमध्ये तिकोने कुटुंब संपले आहे. यामध्ये नंदू तिकोने त्यांच्या पत्नी अनिता तिकोने आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोने तिघेजण ढिगार्याखाली अडकले होते. परंतु योग्य वेळेत त्यांना या मलब्याखालून काढू शकलो नाही आणि यातच या तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफने मलब्या खालून या तीघा जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अत्यंत दुःखद अशी ही घटना असून मावळ मधील दरड प्रवण क्षेत्रामध्ये अजूनही दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आल आहे.