रायगड : हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान सावित्री नदी दुथडी भरून वाहते आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी महाड शहरात शिरले आहे. त्यामुळे रायगड मधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे.
वरंध घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळ देखील दरड कोसळली आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून पुणे आणि रायगड जिल्ह्याचा देखील संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर कशेडी बोगदा जवळ देखील दरड कोसळल्याने महामार्ग बंद झाला आहे. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु अतिवृष्टी आणि दरड कोसळल्या कारणामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रायगडमध्ये सावित्री नदीला पूर आला असून आंबा नदीला देखील पूर आला आहे. परिणामी खोपोली मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कर्जत मधील उल्हास नदीला देखील पूर आला असून बेंडसे आणि व्हावे हे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत.
सध्या महामार्गावरून अवजड वाहनांची तुरळक वाहतूक सुरू आहे. लहान वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासन केले आहे.