महत्त्वाची बातमी : इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद; वारकरी आणि भाविकांनी प्रतिबंधित भागातून जाऊ नये, प्रशासनाचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये एक जुलैपासून पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. धुवाधार पावसाने पुणे शहर आणि परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे वारकऱ्यांना आणि भाविकांना ओढ लागली आहे ती विठ्ठलाच्या दर्शनाची पण आळंदी शहरात इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आळंदी नगरपरिषद प्रशासनाने वारकरी आणि भाविक यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

वारीला निघण्यापूर्वी अनेक जण पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन घेतात. पण मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पूल बंद करण्यात आले असून नदीपात्र किंवा नदीकाठी देखील जाण्याचा प्रयत्न करू नये, त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत सूचनांचे पालन करा अशा सूचना आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिले आहेत. 

सध्या पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. इंद्रायणीसह सर्वच नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. धरणे देखील सर्वच भरत आली आहेत. अशात नागरिकांनी देखील प्रवास करणे टाळावे. महत्त्वाचे म्हणजे दरड प्रवण क्षेत्रामध्ये प्रवास करणे टाळावे. मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याची देखील माहिती येत असल्याकारणाने नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडावे. त्याचबरोबर सर्व शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.