आयपीएलचे संस्थापक आणि माजी आयुक्त ललित मोदी यांनी एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दावा केला की, दाऊद इब्राहिमचा फोन आल्यानंतर ते इतके घाबरले होते की काही क्षण त्यांना बोलताही येत नव्हते. त्या काळात दाऊदचं नाव ऐकूनही मोठमोठे लोक घाबरत असत, असं सांगताना त्यांनी हा प्रसंग आपल्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभवांपैकी एक असल्याचं म्हटलं.
मुलाखतीदरम्यान ललित मोदी यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा अंडरवर्ल्डशी कधीही कोणताही संबंध नव्हता. मात्र, आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात मॅच फिक्सिंगला विरोध केल्यामुळे त्यांना गुन्हेगारी टोळीच्या रोषाला सामोरं जावं लागलं, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सामन्यांमध्ये हस्तक्षेप होऊ द्यावा यासाठी त्यांना कोट्यवधी डॉलरची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती ठामपणे नाकारली.
ललित मोदी यांनी असा आरोपही केला की, ही ऑफर नाकारल्यानंतर त्यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले करण्यात आले. हे हल्ले दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा त्यांनी मुलाखतीत केला. मात्र, तिन्ही वेळा ते बचावले, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी यांच्या मते, आयपीएलचे पहिले तीन हंगाम त्यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही मॅच फिक्सिंगच्या वादाशिवाय पार पडले. त्यांनी आपल्या कार्यकाळात फिक्सिंगसंदर्भात कोणतीही चौकशी झाली नसल्याचाही दावा केला. याच भूमिकेमुळे सट्टेबाजीशी संबंधित गट आणि अंडरवर्ल्डशी त्यांचा संघर्ष वाढल्याचं त्यांनी नमूद केलं.
याशिवाय 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवण्याचा निर्णयही या संघर्षाला कारणीभूत ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं. त्यांच्या दाव्यानुसार, स्पर्धा भारताबाहेर गेल्याने सट्टेबाजांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि त्यानंतर त्यांच्याविरोधातील कारवाया अधिक तीव्र झाल्या.
ललित मोदी यांनी आणखी दावा केला की, या धमक्यांची माहिती संबंधित तपास यंत्रणांनाही होती. मुंबई पोलिसांनी कथित फोन संभाषणाची नोंद केली होती आणि त्यानंतर त्यांना Z-श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. तसेच मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याचा आणि दक्षिण आफ्रिका तसेच मॉन्टेनेग्रोमध्येही त्यांना लक्ष्य करण्याचे कट रचल्याचा आरोप त्यांनी मुलाखतीत केला
#topnewsmarathi #topnews #breakingnews #lalitmodi .