नदी कि नाला ? वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ ! वारी निघायला चार दिवस शिल्लक, पण इंद्रायणी मात्र प्रदूषणाच्या विळख्यात; वारकऱ्यांमध्ये असंतोष - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्र भरातून विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करत आहेत. लवकरच आता आळंदीतून देखील पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघेल, पण अशातच एकीकडे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह, आनंद असताना आळंदीतील इंद्रायणी नदीला पाहून वारकऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. 

हिंदू धर्मामध्ये एकीकडे नदीला पवित्र मानले जाते. इंद्रायणी नदीला देखील भाविक मोठ्या श्रद्धेने पुजतात. पण इंद्रायणीला मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर नाल्याचे रूप आलंय अत्यंत खेदजनक अशी ही घटना आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इंद्रायणी नदीला पाहून वारकरी आणि स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

इंद्रायणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर फेसाळले आहे. स्थानिकांकडून नदीमध्ये औद्योगिक आणि रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होता. परंतु यावर अद्याप पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. नदीच पाणी मोठ्या प्रमाणावर फेसाळले गेले. त्यामुळे आता पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते आहे. वास्तविक पाहता केवळ पालखी सोहळा नाही तर कोणत्याही नदीला नाल्याच स्वरूप येणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. प्रशासनानं तत्परतेने आणि कठोरतेने नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी हे आता गरजेचं झालं आहे.