पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणाऱ्या नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला असून कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या मेट्रो मार्गावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. काही महिन्यांपूर्वी या मार्गांबाबत विविध पर्याय देण्याचे निर्देश मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाला दिले होते. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग थेट विमानतळाला जोडले जाणार आहेत. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याच्या सूचना मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत. शिवाय मेट्रो संदर्भातील विविध कामांमधील बदल करण्याचे आणि वेग देण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिल्याने मेट्रोच्या विविध मार्गांच्या कामांना गती येणार आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रो भवन येथे मेट्रोच्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या सूचना जाणून घेत बैठकीत निर्देश दिले. यावेळी पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, स्थानिक नागरीक तसेच अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार मार्गिका आणि त्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेत आणि पौड रस्ता वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी कचरा डेपोपासूनच नळ स्टॉपच्या धर्तीवर दुहेरी उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहनांची कोंडी दूर होण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच पीसीएमसी–भक्ती शक्ती चौक मार्ग विस्तार, रामवाडी–वाघोली (विठ्ठलवाडी), खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला, नळ स्टॉप–वारजे–माणिकबाग तसेच हडपसर–लोणी काळभोर मेट्रो मार्गिकेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या सद्यस्थितीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारकडे यासाठीचा आवश्यक तो पाठपुरावा करुन या प्रकल्पांना वेग देण्याबाबत मोहोळ यांनी सांगितले. लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी पीएमपीएमएलसमवेत समन्वय साधून नियोजन करण्याबाबतही मोहोळ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीच्या गरजांना लक्षात घेता मेट्रोचा विस्तार अत्यंत आवश्यक असून गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडून आला आहे. नागरिकांचा मेट्रोकडे वाढता प्रतिसाद ही सकारात्मक बाब आहे. गेल्या काही वर्षांत विविध मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून अनेक नवीन मार्गांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. शहराच्या सर्व भागांना तसेच विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीकडे वाढता कल लक्षात घेता मेट्रो नेटवर्कचा विस्तार अत्यंत आवश्यक आहे’
‘पुणे शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी, असे निर्देशही मंत्री मोहोळ यांनी दिले. शहरातील सर्व प्रमुख भाग, औद्योगिक क्षेत्रे, शैक्षणिक केंद्रे तसेच विमानतळ मेट्रोद्वारे जोडण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना गती देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
‘निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही मार्गांच्या रचना पुणेकरांच्या हिताच्याच करा’ : मंत्री मोहोळ
विविध मेट्रो मार्गांवर स्थानिक नागरीकांना सुचविलेल्या बदलानुसार कार्यवाही करण्याबाबत मंत्री मोहोळ यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना सूचित केले असता त्यावर निधीची उपलब्धता आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. त्यावर मोहोळ यांनी सुधारित मंजुरी आणि निधीचे माझ्यावर सोडा. तुम्ही पुणेकरांच्या भविष्याचा आणि हिताचा विचार करुन मार्गांच्या रचना नव्याने करा, असे सूचित केले.
कर्वे रस्त्यावर उड्डाणपूलच नव्हे तर दुमजली उड्डाणपूल, तोही थेट वनदेवीपर्यंत…
पौड फाट्यापासून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गावर पौड फाट्यापासून तर थेट वनदेवी मंदिरापर्यंत दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याबाबत मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास सूचित केले असून याबाबत पुढील कार्यवाही लवकरच सुरु होत आहे. पूर्वी या मार्गावर पौड फाटा ते कर्वे पुतळादरम्यान केवळ वाहनांसाठी उड्डाणपूलाचे नियोजन करण्यात आले होते, मात्र मंत्री मोहोळ यांना केवळ वाहनधारकांसाठीच नव्हे तर थेट वनदेवीपर्यंत मेट्रोसहित दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुहेरी उड्डाणपूलामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांसह डेक्कनहून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय जवळपास पाच सिग्नलचे चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहेत.
HCMTR ला प्रकल्पाची निविदा काढण्याचे निर्देश…
पुणे शहराभोवती ३६ किलोमीटर लांबीच्या आणि २४ मीटरपर्यंत रुंदीचा HCMTR वर्तुळाकार मार्ग साकारण्यावरही अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मंत्री मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांना बैठकीदरम्यान दिले. यामुळे या प्रलंबित प्रकल्पाला वेग येणार असून प्रत्यक्ष कामालाही लवकरच सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.
नियोजित शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज मार्ग हा चांदणी चौक-वाकडपर्यंत करण्यासाठी डिपीआर करण्याचेही निर्देश…
पुणे मेट्रोचा शहराभर विस्तार करत असताना शहराच्या सर्व दिशांना मेट्रोचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज हा नियोजित मार्ग चांदणी चौक-वाकडपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या असून या मार्गासाठीचा डिपीआर करण्याचेही निर्देशही मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिले आहे. या मार्गामुळे शहराभोवती मेट्रोचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार असून मार्गावरील उपनगरातील नागरिकांना मेट्रोची कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार आहे.