जालिंदरभाऊ म्हणजे धडाडी.. - टॉप न्यूज मराठी

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक... जालिंदर भाऊंचे वय जाण्याचे नव्हते.. धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्र गमावला आहे.

  हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव. जालिंदर भाऊ 1999 ते 2002 या कालावधीमध्ये तीन वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीतून तयार झालेले जालिंदर कामटे हे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचा लौकिक होता. पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी, कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावरील निवडणुका  तसेच पुणे विद्यापीठावरील त्यांची अनेक विद्यार्थी आंदोलने गाजली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी बांधलेली संघटना आणि जोडलेले कार्यकर्ते आजही त्यांची वीण घट्ट आहे.

   काँग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या 1992 ते 97 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती होत्या. 1997 मध्ये जालिंदर कामटे हे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 1999 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. राजकारणासाठी हवेली तालुक्याबरोबरच पुरंदर तालुक्यातील त्यांनी आपले राजकीय कार्यक्षेत्र निर्माण केले. स्वर्गीय वसंतदादा पाटील हे त्यांच्या गुरुस्थानी होते. त्यांच्या नावाने त्यांनी कोंढवा येथे शाळा सुरू केली.

  काँग्रेस पक्ष फुटून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पुणे जिल्ह्यात जालिंदर कामठे यांनी शरद पवार यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यावेळी शरद पवार यांच्या समर्थकांची पहिली बैठक जालिंदर कामटे यांच्या क्वीन्स  गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याच्या आवारामध्ये झाली.

संपूर्ण पुणे जिल्ह्याचा राजकीय आवाका असलेले जालिंदरभाऊ यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले. धाडसी आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांचे वैशिष्ट्ये. अनेक कार्यकर्त्यांना जालिंदर भाऊंनी ताकद दिली. उभे केले. स्वतः विधानसभेत गेले नाहीत. परंतु अनेकांना विधानसभेत जाण्यासाठी जालिंदर भाऊंनी दिलेली ताकद सर्वश्रुत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नंतर जालिंदरभाऊ   काही काळ भाजपमध्ये कार्यरत होते. त्यानंतर गेल्या एक -दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपले काम सुरू केले. आपले मित्र स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या नावाने आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी  पुरस्कार त्याचबरोबर समाजातील सामाजिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार त्यांनी सुरू केले. पुण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील  मथुराकट्टा त्यानंतरचा सुभद्रा कट्टा ही गेल्या 30-40 वर्षापासून ची ओळख जालिंदर भाऊ कामठे यांनी पुणे शहर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला  मिळवून दिली. या दोन्ही कट्ट्यांचा राजकीय दबदबा आणि राजकीय कार्यकर्त्यांशी जुळलेले बंध अतूट राहिले.

   जालिंदर यांची धडाडी, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका पत्रकार म्हणून मी जवळून पाहिली . माझ्या आंबेगाव तालुक्यातील धामणी गावाला देखील ते अनेकदा आले. त्यांचे जाणे हे कार्यकर्त्यांच्या चळवळीची मोठी हानी करणारे आहे.

जालिंदरभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🙏

#topnewsmarathi #topnews #breakingnews #punecity