शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देत विधान परिषदेचे आमदार आणि उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
या घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसात यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. “आज पुन्हा एकदा ठाकरे गटातील असंतोष समोर आला आहे. सचिन अहिर हे मूळ शिवसैनिक आहेत आणि त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असे ते म्हणाले.
शिरसाट यांनी पुढे असा दावाही केला की, काही वरिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षात अपेक्षित सन्मान मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. “आम्ही कुणाला आणण्यासाठी कोणतेही ‘ऑपरेशन’ करत नाही. जे नेते किंवा कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, ते स्वतःच्या राजकीय भवितव्याचा आणि पक्षातील वातावरणाचा विचार करून निर्णय घेत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सचिन अहिर हे राज्याचे माजी राज्यमंत्री असून, विशेषतः वरळी परिसरात त्यांचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे त्यांचा ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय हा केवळ राजकीय प्रवेश नसून, ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी आगामी काळात या घडामोडींचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #maharashtrapolitics