मोहरम मिरवणुकीत घातपाताच्या कथित कटाप्रकरणी नवे खुलासे; आरोपी फैयाज प्रेमजीची सखोल चौकशी सुरू - टॉप न्यूज मराठी

कौटुंबिक तणाव, डिजिटल शोध आणि रसायनाच्या स्त्रोताचा तपास; मोबाईल फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला

मुंबईतील भायखळा परिसरात मोहरम मिरवणुकीत कथित घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या फैयाज प्रेमजी याच्याबाबत तपासादरम्यान नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून आरोपीच्या वैयक्तिक, डिजिटल आणि आर्थिक पार्श्वभूमीची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत आरोपी मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. त्याला जगाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना असल्याचे त्याने कथितरीत्या चौकशीत सांगितले आहे. मात्र, त्याला कोणता मानसिक आजार होता का किंवा तो कोणत्याही प्रकारचे उपचार घेत होता का, याची स्वतंत्र पडताळणी पोलीस करत आहेत.

तपासात आणखी एक बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी काही काळापासून कौटुंबिक अडचणींना सामोरे जात होता. त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, या पार्श्वभूमीचा त्याच्या वर्तणुकीशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मानवी शरीरावर झिंक फॉस्फाइडच्या परिणामांबाबत माहिती मिळवण्यासाठी त्याने एआय-आधारित साधनांचा वापर केल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित रसायनाचा स्त्रोत आणि ते त्याने कसे मिळवले, याचाही तपास केला जात आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणात उंदीर आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांबाबत त्याला माहिती असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या पोलिसांकडून आरोपीच्या डिजिटल हालचाली, वैद्यकीय नोंदी आणि संबंधित रसायनाच्या खरेदीविषयीची माहिती तपासली जात आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews