अरुणाचल सीमेलगत चीनच्या हालचालींचा दावा; स्थानिक आदिवासी संघटनेने प्रशासनाकडे व्यक्त केली चिंता - टॉप न्यूज मराठी

सुबनसिरी जिल्ह्यातील नाह वेलफेअर सोसायटीचा आरोप – सीमेलगतच्या भागात चीनी सैन्याची वाढती  उपस्थिती, भारतीय भूभागावर अतिक्रमणाचा दावा

भारत-चीन सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरुणाचल प्रदेशातील अपर सुबनसिरी जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी संघटना नाह वेलफेअर सोसायटीने सीमेलगतच्या भागात चीनकडून भारतीय भूभागावर अतिक्रमण होत असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा प्रशासनाकडेही आपली चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ताक्सिंग परिसरातील त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून चीनी हालचाली वाढल्या आहेत. विशेषतः 2020 नंतर या हालचाली अधिक वेगाने वाढल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

नाह वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चादर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थानिकांना भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सैन्य सीमांचे रक्षण करत आहे. मात्र, सीमेलगतच्या भागात चीनी पीपल्स लिबरेशन आर्मीची (PLA) वाढती उपस्थिती आणि कथित पायाभूत सुविधा उभारणी चिंतेचा विषय ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. संघटनेने असा दावाही केला आहे की, काही भागांत चीनकडून रस्ते आणि तात्पुरत्या संरचना उभारण्यात येत आहेत. तथापि, या दाव्यांबाबत भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची ठाम भूमिका आहे. दुसरीकडे, चीनकडून या प्रदेशातील काही भागांवर दावा केला जात असल्याने दोन्ही देशांमधील सीमावाद अनेक वर्षांपासून कायम आहे. स्थानिक संघटनेच्या ताज्या दाव्यांमुळे पुन्हा एकदा सीमावर्ती परिस्थितीकडे लक्ष वेधले गेले असून, याप्रकरणी केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे

#topnewsmarathi #topnews #breakingnews #indchinborder #chinaborder.