'ही तर दुसरी सोनमच!' केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील सिया गोयलवर राजा रघुवंशीच्या आईंचा संताप - टॉप न्यूज मराठी

सियाच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत नसल्याची उमा रघुवंशी यांची टीका; गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना सहज जामीन मिळण्यावरही व्यक्त केली चिंता

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असताना, इंदूरच्या गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाकडून या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. राजा रघुवंशी यांच्या आई उमा रघुवंशी यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलची तुलना आपली सून सोनम रघुवंशीशी केली असून, तिला 'दुसरी सोनम' असे संबोधले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना उमा रघुवंशी म्हणाल्या की, सिया गोयलचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना सोनमची आठवण झाली. सियाच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. तिचे हावभाव आणि वागण्याची पद्धत सोनमप्रमाणेच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळण्याच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली. अशा प्रकरणांमध्ये आरोपींना सहज जामीन मिळाल्यास चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो आणि त्यामुळे अशा गुन्ह्यांचे मनोबल वाढण्याची भीती असल्याचे त्यांनी नमूद केले. निर्घृण गुन्ह्यांमध्ये कठोर न्याय प्रक्रिया असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रमाचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.

दुसरीकडे, इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची सुनावणी शिलाँग येथील न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी सध्या जामिनावर बाहेर असून, इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #ketanagrawal #lohgadmurdercase