भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया - एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची निवडणूक रांची (झारखंड) याठिकाणी रविवारी पार पडली.
या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक तथा उद्योगपती पुनीत बालन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विदर्भातील माजी खासदार रामदास तडास यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट एमेरिटस) म्हणून, तर बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक (चीफ पॅट्रन) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांची तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर व कार्यकारिणीत देशातील विविध राज्यांतील प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर दिवाणी न्यायालयाचे सहायक निवडणूक अधिकारी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक झाली.
यावेळी महासंघाचे अरुण सिंह, डॉ. राजेश गुप्ता, विवेक रेड्डी, राहुल सिंह, चेतन गोविंद झा, राजेश सिंह, मनोज शर्मा, कुणाल एम. त्रिपाठी, सम्मी सिंह, सुजल केशरी, प्रदीप तिर्की व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांची विविध क्रीडा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कबड्डीला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल देशभरातील सर्व राज्य संघटना आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कबड्डी हा भारताचा पारंपरिक आणि जनमानसाशी जोडलेला खेळ आहे. या खेळाला जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, आधुनिक प्रशिक्षण सुविधा उभारण्यासाठी आणि महिला तसेच युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राज्य संघटनांना सोबत घेऊन भारतीय कबड्डीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,”
- पुनीत बालन, नवनिर्वाचित अध्यक्ष.