"संगीत म्हणजे काय?" असं जर कोणाला विचारलं, तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. कोणासाठी तो एकांतातला सोबती असतो, कोणासाठी गजबजलेल्या गर्दीतली ऊर्जा, तर कोणासाठी डोळ्यांतून वाहणारं पाणी सुकवणारा सुरांचा हातमाल. आज २१ जून, म्हणजेच 'जागतिक संगीत दिन' कॅलेंडरवरचा हा दिवस खरं तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला 'बॅकग्राउंड म्युझिक' देणाऱ्या त्या अमूर्त भावनेचा कृतज्ञता सोहळा आहे.
पॅरिसच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला सुरांचा प्रवास:
हा दिवस सुरू कसा झाला, याची गोष्ट खूपच रंजक आहे. १९८१ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मौरिस फ्ल्यूरेट यांनी विचार केला की, संगीत हे फक्त बंदिस्त थिएटर्स किंवा श्रीमंतांच्या कॉन्सर्ट्सपुरतं मर्यादित का असावं? ते प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं.
त्यातूनच पुढे २१ जून १९८२ रोजी फ्रान्समध्ये पहिल्यांदा ‘फेटे द ला म्युझिक’ म्हणजेच संगीताचा सण साजरा केला गेला. त्या दिवशी एकच नियम होता—जो कोणी संगीतप्रेमी आहे, त्याने रस्त्यावर यायचं आणि आपली कला सादर करायची! हीच सुंदर संकल्पना पुढे युरोप ओलांडून आज जगभर पसरली आहे
जेव्हा औषधं अपुरी पडतात, तेव्हा सूर काम करतात!:
आपल्याला जेव्हा खूप टेन्शन येतं, तेव्हा आपण हेडफोन्स कानाला लावतो आणि डोळे बंद करतो. हे केवळ टाईमपास नाही, तर विज्ञान आहे! आज जगभरात ‘म्युझिक थेरपी’ चा वापर मानसिक आणि शारीरिक आजार बरे करण्यासाठी केला जातोय.
ऑफिसचा ताण असो की भविष्याची काळजी, एक आवडतं गाणं तुमचा मूड एका मिनिटात बदलू शकतं
अभ्यासाचा कंटाळा आलाय? शास्त्रज्ञ सांगतात की, हलकं शास्त्रीय संगीत ऐकल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढते
ऐकल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत होते
रिल्स आणि डिजिटल युगातलं 'स्मार्ट' संगीत
काळ बदलला तसं संगीत ऐकण्याचं माध्यमही बदललं. पूर्वी कॅसेट्स आणि सीडीचा काळ होता, आज हातातील मोबाईलमध्ये हजारो गाणी उपलब्ध आहेत. आजच्या डिजिटल युगात:
ओटीटी आणि स्ट्रीमिंग अॅप्समुळे आपल्याला जगाच्या पाठीवरील कुठल्याही कोपऱ्यातलं संगीत एका क्लिकवर ऐकायला मिळतं.
सोशल मीडिया आणि रिल्समुळे अनेक नवोदित कलाकारांना, ज्यांना कधीकाळी स्टेज मिळाला नसता, त्यांना आज घरबसल्या लाखो श्रोते मिळत आहेत.
आजच्या दिवशी जगभरात अनेक व्हर्च्युअल कॉन्सर्ट्स, लाईव्ह सेशन्स आणि डिजिटल गान महोत्सवांचे आयोजन केले जाते, जे संगीतप्रेमींना स्क्रीनच्या माध्यमातून एकत्र आणतात.
आजच्या दिवसाचा खरा संदेश
जागतिक संगीत दिनाचा उद्देश केवळ गाणी ऐकणं एवढाच नाही, तर त्यामागील प्रेम, शांतता आणि एकात्मता अनुभवणं हा आहे. संगीत ही अशी भाषा आहे ज्याला ना कुठली सीमा असते, ना कुठली जात-पात..आजच्या या खास दिवशी आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घेऊया आणि सुरांच्या या दुनियेत हरवून जाऊया. तुम्हा सर्वांना 'जागतिक संगीत दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा!