झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका 'अग्गंबाई सासूबाई' यामधील सासू-सुनेची जोडी प्रेक्षकांना आजही चांगलीच लक्षात आहे. एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सासू आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ आणि सून शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ही ऑन-स्क्रीन जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली असून, या दोन्ही लाडक्या अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत.
पण थांबा... कोणत्याही नवीन मालिकेत किंवा चित्रपटात नाही, तर झी मराठी वाहिनीच्या आगामी 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेच्या विशेष प्रमोशनल चित्रीकरणाच्या निमित्ताने या दोघींनी स्क्रीन शेअर केली आहे. या भेटीदरम्यान दोघींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ....
या पुनर्भेटीबद्दल बोलताना तेजश्री प्रधानने निवेदिता सराफ यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तेजश्री म्हणाली, "निवेदिता ताईंना भेटण्याचा अनुभव नेहमीच खूप ऊर्जा देणारा आणि खास असतो. 'कृष्णाईच्या लेकी'च्या सेटवर त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि 'अग्गंबाई सासूबाई'च्या दिवसांची आठवण आली. आम्हाला गप्पा मारताना पाहून पूर्वी डॉ. गिरीश ओक नेहमी चेष्टेने म्हणायचे की, 'सगळ्या गप्पा आत्ताच मारू नका, काही मालिकेसाठी शिल्लक ठेवा.' तो प्रसंग आजही जसाच्या तसा लक्षात आहे
निवेदिता सराफ यांच्या प्रेमळ स्वभावाचे कौतुक करताना ती पुढे म्हणाली की, निवेदिता ताई केवळ एक उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्रीच नाहीत, तर त्या अतिशय काळजीवाहू आहेत. सेटवर कोणी आपल्या आवडीचा पदार्थ सहज बोलून गेला, तरी त्या ते लक्षात ठेवतात आणि दोन-तीन दिवसांत स्वतःच्या हाताने तो पदार्थ बनवून घेऊन येतात.
कोण आहेत 'कृष्णाईच्या लेकी'?
झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत कृष्णाईच्या तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि महत्त्वाकांक्षी मुलींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या तीन मुख्य भूमिका पुढील अभिनेत्री साकारत आहेत:
शारदा (एकता लब्दे)- कृष्णाईची ही मोठी मुलगी आपल्या आईसारखीच अत्यंत संयमी आणि सुगरण आहे. खानावळ चालवणाऱ्या आईला ती जेवणाच्या व्यवसायात मोलाची मदत करते.
गौरी (ट्विंकल यादव)-मधली मुलगी गौरी ही वकिलीच्या परीक्षेत अव्वल आली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी गौरी, भविष्यात 'कलेक्टर' होण्याचे स्वप्न पाहत आहे.
सौदामिनी/नारायणी (नारायणी वर्णे)-घरातील सर्वात लहान मुलगी जी अभ्यासासोबतच खेळातही अत्यंत चपळ आणि हुशार आहे.
निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान यांच्या या खास प्रोमोमुळे आता या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.