शहरातील तलावांचे संवर्धन, पर्यावरणीय संरक्षण आणि पुणेकर नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पाषाण, कात्रज आणि जांभुळवाडी या तीन महत्त्वाच्या तलावांसाठी 'लेक सिटी' प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज प्रशासनाला दिले
तसेच, जांभुळवाडी तलावाचे जलसंधारण विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला या तलावाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे
पुणे शहरातील या महत्त्वाच्या तलावांच्या सद्यस्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा थेट विसर्ग, जलपर्णीचा वाढता प्रादुर्भाव, आणि नुकत्याच घडलेल्या मृत मासे आढळण्याच्या घटनांमुळे तलावांचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. अपुऱ्या देखभालीमुळे या जलस्रोतांचे विद्रुपीकरण होत असल्याबद्दल बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहराच्या पर्यावरणीय सुरक्षेसाठी 'लेक सिटी' प्रकल्प अत्यंत गरजेचा असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.
'लेक सिटी' मास्टर प्लॅनमध्ये काय असणार?
पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन : प्रकल्पाचा परिसरावर होणारा परिणाम तपासणारा अधिकृत 'ईआयए' अहवाल.
जैवविविधता संवर्धन: तलावांच्या परिसरातील पक्षी, वनस्पती आणि जलचरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद.
प्रशासकीय हस्तांतरण: जांभुळवाडी तलावाचे व्यवस्थापन महापालिकेकडे घेण्यासाठी शासनस्तरावरील प्रक्रिया तातडीने सुरू करणे.
कात्रज आणि पाषाण तलावांसाठी विशेष ॲक्शन प्लॅन
बैठकीत केवळ भविष्यातील योजनांवरच नव्हे, तर सद्यस्थितीतील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत:
१. कात्रज तलाव :
कात्रज तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. या प्रकरणी तलावातील पाण्याचे नमुने आणि प्रयोगशाळेचा अहवाल तातडीने स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण विभागाचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
२. पाषाण तलाव :
पाषाण तलावातील जलपर्णी, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जलपर्णी हटविणे, गाळ काढणे आणि सांडपाणी रोखण्यासाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला, याचा सविस्तर हिशोबही मागवण्यात आला आहे.
पुणेकरांना काय मिळणार?
हा 'लेक सिटी' प्रकल्प केवळ तलावांचे प्रदूषण रोखण्यापुरता मर्यादित नसून, यामुळे पुणेकरांना उत्तम पर्यटन आणि विरंगुळ्याची ठिकाणे मिळणार आहेत. तलावांच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच सुदृढ पर्यावरणाचा लाभ थेट नागरिकांना होईल.प्रशासनाला या कामांचे अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश असल्याने, येत्या काही दिवसांतच 'लेक सिटी' प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती आलेली पाहायला मिळू शकते.