‎​साडेतीन शक्तिपीठांपैकी एक, अंबाबाईचे मंदिर आता सुवर्णकळसाने झळाळले! - टॉप न्यूज मराठी

‎कोल्हापूरकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी. करवीर निवासिनी आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस बसविण्याचे ऐतिहासिक काम अखेर पूर्ण झाले आहे. 

या सुवर्णकामाची सांगता झाली असून, अंबाबाईचे मंदिर आता सुवर्णकळसाने झळाळून उठले आहे. अधिक मासाचे औचित्य साधून हे काम पूर्ण करण्यात आले असून, यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

‎

‎अंबाबाई मंदिराच्या शिखराचे संरक्षण करण्यासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची संकल्पना पुढे आली होती. 

याच दरम्यान गोव्यातील एका भाविकाने सोन्याचा कळस दान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि या उपक्रमाला नवे स्वरूप मिळाले. 

६ फूट उंचीच्या मूळ शिखराचा अभ्यास करून, मंगलोर येथील कुशल कारागिरांकडून हा भव्य कळस तयार करण्यात आला. सुमारे अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि दीड किलो सोन्याचा हा कळस गुरुवारी रात्री अत्यंत सुरक्षितपणे शिखरावर बसविण्यात आला.

‎

‎

‎कळस अत्यंत नाजूक असल्याने आणि ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का लागू नये म्हणून प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेण्यात आली. 

कासव मंडपावरील कळसावर पहिले आवरण बसवून क्रेनच्या मदतीने हा सुवर्णकळस शिखरापर्यंत नेण्यात आला. मंदिरावर सुवर्णकळस चढल्याचे वृत्त समजताच कोल्हापूरकरांसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वर्षाला ५० लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात, आता हे मंदिर दूरवरूनच आपल्या सुवर्णकळसाने भाविकांना आकर्षित करत आहे.