अमरावतीतून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात एका २२ वर्षीय तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.
या गूढ आणि अंगावर काटा आणणाऱ्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा मारेकरी दुसरा कोणी नसून तिचा सख्खा मावसभाऊच निघाल्याचे तपासात उघड झाले आहे. घटनास्थळी कोणताही थेट पुरावा किंवा सीसीटीव्ही उपलब्ध नसताना, गुन्हे शाखेने केवळ तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या चक्रांच्या जोरावर या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोधून काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन जंगल परिसरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख काजल जितेंद्र इंगळे अशी पटली असून, पोलिसांनी तिचा मावसभाऊ चेतन सुनील थोरात याला ताब्यात घेतले आहे. आरोपी चेतनने काजलचा खून केल्यानंतर तिची ओळख पूर्णपणे मिटवण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल ओतून त्याला आग लावल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नसणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते; मात्र अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील तब्बल ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल असून, त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिलेल्या वस्तूंचा शोध पोलीस घेत आहेत.