थेंबभर पाण्यासाठी वणवण.. नंदुरबारमधील महिलांच्या वेदनेचं भयानक वास्तव; फक्त 'टॉप न्यूज मराठी'वर - टॉप न्यूज मराठी

‎महाराष्ट्रात एकीकडे प्रगतीच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना,

 दुसरीकडे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील एका धक्कादायक वास्तवाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. 

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी गावातील आदिवासी पाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

 पण ही टंचाई फक्त पाण्याच्या घोटापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर याचा थेट आणि गंभीर परिणाम तिथल्या महिलांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. 

पाण्यासाठी रोज मैलोन्मैल होणाऱ्या पायपीठामुळे महिलांना गर्भाशयाचे विकार, पाठदुखी आणि अगदी गर्भपातासारख्या अत्यंत वेदनादायी संकटांचा सामना करावा लागत आहे. 

पाहूयात यावरचा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट...

‎नंदुरबारच्या दुर्गम आदिवासी भागातील महिलांचे आयुष्य आज केवळ पाण्याच्या शोधाभोवतीच फिरताना दिसत आहे. 

अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय.

 इथल्या महिलांना दररोज तब्बल ४ ते ५ किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतोय. डोंगरउतारावरून,

 काट्याकुट्यांच्या वाटेने डोक्यावर ७ ते १० किलो वजनाचे पाण्याचे हंडे घेऊन या महिलांची दररोज अग्निपरीक्षा सुरू आहे. 

पण या सततच्या कष्टांमुळे आता महिलांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. 

कमी वयातच पाणी वाहून नेण्याच्या या कामामुळे महिलांमध्ये गर्भाशय खाली येणे, तीव्र पाठदुखी, पोटदुखी आणि वारंवार होणारे संसर्ग वाढले आहेत. 

धक्कादायक म्हणजे, याच कष्टामुळे अनेक गर्भवती महिलांना गर्भपाताचाही सामना करावा लागला आहे.

‎

‎आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर लगेचच महिलांना विश्रांती मिळणे गरजेचे असते. 

मात्र, परिस्थितीअभावी या महिलांना पुन्हा जड ओझे वाहावे लागते. ज्यामुळे श्रोणीचे स्नायू कमकुवत होऊन गर्भाशयाच्या विकारांचा धोका कैक पटीने वाढतो.

 त्यातच, जे पाणी मिळते ते दूषित आणि साचलेले असल्याने त्वचारोग आणि मूत्रमार्गाचे संसर्ग (UTI) झपाट्याने पसरत आहेत. दुसरीकडे, 

या दुर्गम भागात पुरेशा आरोग्य सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या महिलांना नाइलाजाने पारंपरिक वैद्य आणि वनौषधींवर अवलंबून राहावे लागत आहे.