तुंबाडची मंजुल हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया कसा आहे हा सिनेमा.
गेले अनेक दिवस मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती ती म्हणजे तुंबाडची मंजुळा या चित्रपटाची. अप्रतिम स्टारकास्ट आणि त्यातच सस्पेन्सने पुरेपूर भरलेला टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपताबाबत कमालीची उत्सुकता लागलेली होती. आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. भय, रहस्य आणि विनोदाची उत्तम मेळ दिग्दर्शन विविध कोरगावकरने या चित्रपटात घातली आहे. एक कन्नड चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि त्याला मराठीचा उत्तम टच देण्यात आला आहे. कोकणातील एका गावात घडणारी ही गोष्ट आहे.
केशव (ओम भुतकर) च्या आजीचे निधन झालेले असते. तिच्या अंत्यविधिकरिता गावातील सगळी मंडळी केशवच्या घरी जमलेली असतात. रवी अण्णा (जितेंद्र जोशी), सतीश (अंशुमन विचारे), दिघया (गणेश पंडित), अशी काही मंडळी गावातील म्होरकी असतात. रवी अण्णा हा गावातील सर्वांना मदत करणार तरुण दाखवला आहे. दरम्यान एक दिवशी केशवळ भूतबाधा झाली आहे अशी कुणकुण गावातील मंडळींना लागते. त्यामुळे सगळे गावकरी घाबरलेले असतात. गावामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असते. त्यामुळे सगळे गावकरी एक बैठक घेतात आणि केशवच्या अंगामध्ये घुसलेले भूत उतरवायचं ठरवतात. करुणाकर गुरूजी (मकरंद अनासपुरे) यांना गावामध्ये बोलावण्यात येते.
केशवचण हे बहुत काढण्यासाठी गुरूजी काय काय प्रयोग करतील हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच वेळी त्याच्या अंगात मंजुळा नावाच्या भूताने त्याला झपाटलेले आहे असे सगळ्यांना वाटते आणि मग कशा प्रकारे गोंधळ आणि गडबड सुरू होते, रवी अण्णा यामध्ये नेमकी काय भूमिका घेतो आणि मुख्य म्हणजे ही मंजुळा कोण आहे आणि तिने केशवला खरोखर झपाटलेले असते का की ही फक्त अफवा असते ह्या प्रश्नांच्या उतरांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शक विविध कोरगावकरचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि त्याने चांगला प्रयत्न केला आहे. ह्या चित्रपटातील प्रत्येक भावना आणि गावकारींच्या मनातील चलबिचल त्याने पडद्यावर छान मांडल्या आहेत. अभिनेता जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, वर्षा दांदळे, सिद्धेश्वर झाडबुके, शार्दुल सराफ, रिल स्टार अर्थव रुके, प्रियल नाईक आदी कलाकारांनी आपापली कामे चोख केली आहेत.
मात्र चित्रपटाचा भावनिक सार सई ताम्हणकरच्या शोभा या व्यक्तिरेखेमुळे अधिक ठळक होतो. आयुष्याच्या संघर्षात अडकलेल्या स्त्रीची वेदना तिने अत्यंत सहज आणि प्रभावीपणे साकारली आहे. उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका उत्तमपणे निभावत कथेला भक्कम आधार दिला आह.
तांत्रिकदृष्ट्या पाहता, कौशल गोस्वामी यांचे छायाचित्रण चित्रपटाची मोठी जमेची बाजू ठरते. कोकणातील निसर्गसौंदर्य आणि रहस्यमय वातावरण त्यांनी प्रभावीपणे पडद्यावर उभे केले आहे. 'तर्राट', 'झाडाने धरलंय भूत' आणि 'देवा मला पाव की रं' ही गाणी चित्रपटाची रंगत वाढवतात. पूर्वार्ध थोडा संथ वाटत असला तरी उत्तरार्धातील घडामोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. एकूणच, भय, विनोद आणि सामाजिक आशय यांचा समतोल साधणारा हा मनोरंजक चित्रपट आहे.
#topnewsmarathi #topnews #trending #marathimovie #tumbaadchimanjula