पतित पावन संघटनेची महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणी बरखास्त; नव्या संघटनात्मक पुनर्रचनेची घोषणा - टॉप न्यूज मराठी

गेली ५५ वर्षे पतित पावन संघटना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक, सामाजिक न्याय, हिंदुत्ववादी विचारसरणी तसेच अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारी एक अग्रगण्य सामाजिक संघटना म्हणून कार्यरत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जनार्दन उर्फ जनाभाऊ पेडणेकर यांनी समाजहित, संघटनात्मक शिस्त व संघटनेच्या व्यापक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संघटनेच्या भविष्यातील वाटचालीस अधिक गतिमान व सक्षम करण्यासाठी आज दिनांकापासून महाराष्ट्रासह सर्व जिल्हा, शहर व ग्रामीण स्तरावरील विद्यमान कार्यकारिण्या बरखास्त करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेश कार्यकारिणी यांनी यापूर्वी केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे.

नवीन संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी, पदाधिकाऱ्यांची निवड व पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्रभर नवीन कार्यकारिणींची स्थापना करण्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांकडे अधिकृत जबाबदारी सोपविण्यात येत आहे :

* श्री. धनंजय क्षीरसागर – महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

* श्री. स्वप्निल नाईक – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष

* श्री. प्रवीण झंवर – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

* श्री. मनोज पवार – पुणे शहर व जिल्हाध्यक्ष

* श्री. संतोष शेंडगे – पुणे शहर कार्याध्यक्ष

वरील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, शहर व ग्रामीण भागांमध्ये नवीन कार्यकारिणींची उभारणी, संघटनात्मक पुनर्रचना व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. सदर प्रक्रिया पारदर्शक, संघटनात्मक नियमांनुसार व समाजहित लक्षात घेऊन राबविण्यात येणार आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जनार्दन उर्फ जनाभाऊ पेडणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, "पतित पावन संघटना ही कोणत्याही व्यक्तीची नसून समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची संघटना आहे. समाजकारण, हिंदुत्व, सामाजिक न्याय व अन्यायाविरुद्ध संघर्ष हीच संघटनेची ओळख राहिली आहे. बदलत्या काळानुसार संघटनेची पुनर्बांधणी करणे आवश्यक असून नवीन नेतृत्वाला संधी देत अधिक सक्षम संघटनात्मक रचना उभी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे."

संघटनेचे पालक मा. श्री. शिवाजीराव चव्हाण यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक शिस्त पाळून नव्या उभारणीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

पतित पावन संघटना आगामी काळात महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व जनहिताच्या प्रश्नांवर अधिक ताकदीने कार्यरत राहील, असा विश्वास संघटनेच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.