शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तर यांनी शिवसेनेला संपवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सत्तरांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. युतीत अनेक ठिकाणी बंडखोर अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती सांभाजीनगरमधून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपसोबत युती तोडण्यावरही भाष्य केले होते. यावर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तार यांनी, ‘जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल आमचे मुकुट गेले. आता छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये भाजपा लक्ष घालून आमच्या मध्ये दोन गट कसे पडतील हे पाहत आहे. आमचे मुंडके सत्तेपासून बाजूला केले, आता हळूहळू यांचे मुंडके छटण्याचे काम सुरू आहे. कालचे नेते शिवसेना कमकुवत करण्याचे काम करत आहेत. मोठा भाऊ युती संपवत आहे’ असा आरोप करत युती संपवण्याची भाषा केली होती. याला आता महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाजन यांना अब्दुल सत्तार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना महाजन म्हणले की, ‘अब्दुल सत्तार सध्या खूप मोठे नेते झाले आहेत. ते तर आता युती ठेवायची की नाही यावर आता विचार करू लागले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा घास कशाला घ्यायला पाहिजे. आपण आपल्यापुरतं बोला, जिल्हयापुरतं बोला. युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल सत्तार असं बोलत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये असा माझा त्यांना सल्ला आहे. पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, युती बाबत बोलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. सत्तार साहेब सध्या आमदार आहेत, त्यांनी असं बोलून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. यामुळे होणार काही नाही, पण अशी विधाने टाळावीत असा सल्ला गिरीश महाजन यांनी सत्तार यांना दिला आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #maharashtrapolitics #politics