भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी धर्मेंद्र यांच्या वतीने पद्मविभूषण स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्या अत्यंत भावनिक झालेल्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पतीला गमावल्याचे दुःख स्पष्ट जाणवत होते.
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिले. जवळपास सहा दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले. ‘शोले’, ‘फूल और पत्थर’, ‘अनपढ़’, ‘हकीकत’, ‘बंदिनी’, ‘सीता और गीता’, ‘मेरा गांव मेरा देश’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते.