पुणे, 22 मे 2026 : पुण्यात मागील काही दिवसांपासून दिवसभर कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे पुणेकर त्रस्त झाले होते. गुरुवारी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुण्याच्या शिवाजीनगर कोंढवा, औंध, बाणेर, बालेवाडी, सांगवी, सिंहगड रोड, बाणेर, बालेवाडी, आंबेगाव आणि कात्रज परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि त्यानंतर शहराच्या विविध भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचाही जोर वाढल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर वाहतूक काही काळ मंदावली होती.