‎ग्राहक बनून आल्या अन्... ‎ ‎भोरच्या नसरापूर मध्ये सराफा बाजारात चोरी; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर - टॉप न्यूज मराठी

‎पुण्यातील भोरमधून एक धक्कादायक आणि तितकीच सावध करणारी बातमी समोर येत आहे. ग्राहक बनून आलेल्या महिलांच्या एका टोळीने सराफा दुकानातून हजारो रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 भोरमधील नसरापूर बाजारपेठेतील प्रसिद्ध 'पंडित ज्वेलर्स'मध्ये हा प्रकार घडलाय. पाच महिलांनी मिळून दुकानदाराची नजर चुकवून सोन्याच्या नथनीचे पाऊच अत्यंत हुशारीने पळवले आहेत. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

‎

‎नसरापूर बाजारपेठेतील पंडित ज्वेलर्समध्ये १३ मे रोजी ही घटना घडली. दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असताना, 

अचानक पाच महिला ग्राहक बनून दुकानात आल्या. त्यांनी दुकानदाराला वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवण्यास सांगून बोलण्यात गुंतवून ठेवले. दुकानदार महिलांना दागिने दाखवण्यात व्यस्त असतानाच,

 एका महिलेने अत्यंत चलाखीने आणि हातसफाई करत सोन्याच्या नथनीचे पाऊच गायब केले.या धाडसी चोरीमध्ये अंदाजे ८४ हजार ६०० रुपये किमतीचे, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. सुरुवातीला दुकान मालकांना चोरी झाल्याचा कोणताही संशय आला नव्हता. मात्र, काही दिवसांनी दुकानातील साहित्याची आणि पाऊचची मोजणी करताना दोन पाऊच कमी असल्याचे मालक विनय पंडित यांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही  फुटेज तपासले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलांच्या टोळीने कशा प्रकारे हातचलाकी केली, हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 

याप्रकरणी आता पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात येत आहे.