दोघांकडून बेछूट गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गॅंगचं कनेक्शन, अन् आरोपी फरार;पिंपरी- चिंचवडच्या मॉलमध्ये नेमकं काय घडलं ? - टॉप न्यूज मराठी

पिंपरी-चिंचवड शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय. काल रात्रीच्या सुमारास AJ फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी बेछूट गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानंतर सोशल मीडियावरून धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यामुळे या गोळीबाराचा थेट संबंध लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी जोडला जातो. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हे आरोपी एका टू व्हीलर वर आले होते. त्यातील एकाने खाली उतरून तर एकाने गाडीवर बसूनच ए जे फर्निचर मॉलवर बेधुंद गोळीबार केला. 

अंदाजे आठ ते नऊ गोळ्या फायर केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोघांनी प्रत्येकी तीन ते चार गोळ्या झाडल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. 

आरोपींनी दुकानाचा बोर्ड आणि नावाला टारगेट केलं होतं. त्यामुळे सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. मात्र अवघ्या काही सेकंदात गोळीबार करून हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

 या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तसेच व्यापाऱ्यांमध्येही दहशत निर्माण झाली. स्थानिकांकडून तातडीने पोलिसांना कळविण्यात आलं. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीमनंही पुरावे गोळा केले. 

पोलिसांनी रात्रीच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला. मात्र त्याच वेळी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. 

या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर यानं घेतली. याचा अनुषंगाने त्याने पोस्ट करत मॉल मालक अशोक नयन यांच्यावर एमडी ड्रग्स आणि हवाला व्यवहाराचे आरोप केले आहेत.

 तसंच 'हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात घालू', अशी थेट धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये ‘वीर फर्निचर’शी संबंधित मुकेश सहराना यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे. 

मात्र ही पोस्ट खरी की बनावट याची सत्यता पोलिसांकडून पडताळली जात आहे. 

पिंपरी चिंचवड पोलीस सध्या अलर्ट मोडवर असून या गोळीबारामागे खंडणी, गँगवॉर की आणखी कोणतं कारण आहे ? 

गोळीबाराचा संबंध खरंच बिश्नोई गॅंगशी आहे का ? व्हायरल पोस्टमध्ये केलेले आरोप खरे आहेत का ? याचा तपास केला जातोय. 

मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवडच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.