समृद्धी महामार्गावर प्रवास करताय? थांबा ! ही आहे महत्वाची बातमी - टॉप न्यूज मराठी

‎अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी आता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावर वाहनांच्या अनिर्बंध वेगाला लगाम घालण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.याबाबत सविस्तर माहिती पाहूया 

‎हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग... राज्याची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. या अपघातांमागे मुख्य कारण ठरत आहे ते म्हणजे वाहनांचा अनियंत्रित वेग!आता याच वेगाला वेसण घालण्यासाठी अमरावती जिल्ह्यातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या टप्प्यावर प्रशासनाकडून हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.प्रशासनाने समृद्धी महामार्गावर प्रवासाचा वेळ वाचवण्यासोबतच सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी महामार्गावर वाहनांची किमान वेगमर्यादा १०० किमी प्रतितास आणि कमाल वेगमर्यादा १२० किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे परंतु, असे असूनही अनेक वाहनचालक या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने, म्हणजेच तब्बल १४० ते १५० च्या स्पीडने वाहने पळवत असल्याचे निदर्शनास आले आहे. हाच अतिवेग भीषण अपघातांना आमंत्रण देत आहे.हेच अपघात रोखण्यासाठी आता अमरावती जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. महामार्गावर बसवण्यात आलेल्या या अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गाड्यांच्या वेगावर २४ तास सतत नजर ठेवली जाणार आहे.जर कोणत्याही वाहनाने १२० किमी प्रतितास या कमाल वेगमर्यादेचे उल्लंघन केले, तर ते कॅमेऱ्यात कैद होईल आणि संबंधित वाहनचालकावर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एवढेच नाही, तर त्यांचा ई-चलान थेट त्यांच्या मोबाईलवर पाठवला जाईल.