पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील एका मेडिकल दुकानात चोरीचा अजब प्रकार समोर आला. खराबवाडी येथे एका मेडिकल दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी काही वस्तूंवर डल्ला मारला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील महागडी औषधं किंवा इतर मौल्यवान वस्तू न चोरता कंडोम, कॅटबरी आणि झंडू बॉम्बचे बॉक्स चोरून नेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चाकणच्या खराबवाडी येथील माही मेडिकलमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. 3 चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला. मात्र नेमकं चोरायचं काय हेच त्यांच्या लक्षात आलं नसावं म्हणून बराच वेळ शोधाशोध केली. त्यानंतर दुकानातील रोकडबरोबरच त्यांनी कंडोम, चॉकलेट्स, पाण्याची बाटली आणि झंडू बॉम्बचे बॉक्स लंपास केले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र चोरट्यांनी चोरून नेलेल्या वस्तूंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय.