नाशिकच्या मालेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका ६ वर्षांच्या चिमुकल्याचा अतिशय दुर्दैवी अंत झाला आहे. घराच्या अंगणात खेळत असताना अंगावर लोखंडी गेट पडल्याने या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
vo
मालेगाव तालुक्यातील सातमाने येथील ही घटना आहे. स्वरांग स्वप्निल जाधव हा अवघ्या सहा वर्षांचा चिमुकला आपल्या घरासमोरील अंगणात नेहमीप्रमाणे खेळत होता. खेळता खेळता तो घराच्या कंपाऊंड गेटजवळ गेला. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अचानक कंपाऊंडलगत बसवण्यात आलेले जड लोखंडी गेट तुटले आणि थेट स्वरांगच्या अंगावर कोसळले.
या भीषण अपघातात स्वरांगच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या चिमुकल्याला तातडीने वाचवण्याचे प्रयत्न झाले, मात्र दुखापत इतकी गंभीर होती की उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सातमाने गावावर आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.