पुण्यातील सिंहगड कॅम्पसमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या कॅम्पस मध्ये एका 40 वर्षीय सुरक्षारक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. समीर माधव दाभोळकर असं या मृत सुरक्षारक्षकाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी समीर यांनी एक व्हिडिओ बनवून आपली व्यथा मांडली आणि त्यानंतर आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान हा व्हिडिओ सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागला आहे.
VO
समीर दाभोळकर हे सिंहगड कॅम्पसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी कॅम्पस परिसरातील एका खोलीत गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये साक्षी मला माफ कर, पगार होत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं ते म्हणताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षांपासून समीर यांचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तर आत्महत्या पूर्वी बनवलेला व्हिडिओ हा सर्वात सबळ पुरावा आहे. त्यामुळे सिंहगड कॅम्पस व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समीर यांच्याप्रमाणे आणखी किती कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत. आणि पगार न देण्याचं नेमकं कारण काय हे पोलिसांकडून शोधलं जाणार आहे. मात्र सिंहगड सारख्या मोठ्या संस्थेमध्ये असा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.