अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा रोडवर दोन तरुणांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
ही घटना नेमकी आत्महत्या आहे की घातपात? या प्रश्नाने आता परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात धाबा रोडवरील महान परिसरात असलेल्या वॉटर सप्लायजवळ,
एकाच झाडाला दोन तरुणांचे मृतदेह एकाच दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
किशोर सोनटक्के आणि किशोर बोडके अशी या मृत व्यक्तींची नावे असून, ते अनुक्रमे पिंजर आणि मंगरूळपीर येथील रहिवासी होते.
दोन वेगवेगळ्या गावातील तरुणांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल का उचलले, की यामागे काही घातपाताचा प्रकार आहे, याबाबत सध्या तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके आणि बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
सध्या दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे महान आणि परिसरात सध्या भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.