इगतपुरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वनविभागाने एका भोंदू बाबाचा पर्दाफाश केला असून त्याच्या घरातून तब्बल दोन लाख रुपये किमतीचे वन्यजीवांचे अवयव जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, कारवाई टाळण्यासाठी या भोंदू बाबाने चक्क सर्च वॉरंटच गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाहूयात या थरारक कारवाईचा हा सविस्तर रिपोर्ट."
इगतपुरी तालुक्यातील गिरणारे (बनवाडी) परिसर... जिथे गेल्या काही काळापासून चंद्रकांत राजेंद्र माळी नावाचा ३३ वर्षीय तरुण भोंदूगिरीच्या जोरावर लोकांची फसवणूक करत होता. मात्र, तो केवळ फसवणूकच करत नव्हता, तर वन्यजीवांची तस्करी आणि त्यांच्या अवयवांचा काळाबाजारही करत होता. इगतपुरी वनविभागाला या बाबाबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरू झालं वनविभागाचं 'मिशन सर्च'!वनविभागाने जेव्हा या भोंदू बाबाच्या घरावर धाड टाकली, तेव्हा तिथे सापडलेलं साहित्य पाहून अधिकारीही थक्क झाले. यात रानडुकराचे दात, सांबर आणि काळविटाची शिंगे, घुबडाचे अवयव, सालिंदरचे काटे आणि मोरपिसे अशा वस्तू सापडल्या. एवढंच नाही तर या भोंदू बाबाकडे एक धारदार तलवारही आढळून आली आहे. जप्त केलेल्या या सर्व वन्यजीव अवयवांची अंदाजे किंमत २ लाख रुपये इतकी आहे.
या कारवाईत एक अजब आणि नाट्यमय प्रकारही घडला. वनविभागाचे अधिकारी जेव्हा कायदेशीर रित्या सर्च वॉरंट घेऊन बाबाच्या घरात शिरले, तेव्हा आपली चोरी पकडली जाईल या भीतीने आरोपी चंद्रकांत माळी याने चक्क ते 'सर्च वॉरंट'च खाऊन टाकले. पुरावा नष्ट करण्याचा हा अघोरी प्रयत्न पाहून वनअधिकारीही काही वेळ चक्रावून गेले. मात्र, वनविभागाने तातडीने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.