छत्रपती संभाजीनगर हादरलं! विहिरीला पाणी लागलं.. आनंद झाला अन् मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून बाप-लेकांचा मृत्यू - टॉप न्यूज मराठी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली.. 

सिल्लोड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

शेतातील विहिरीला पाणी लागल्याचा आनंद काही क्षणातच दुःखात परावर्तित झाला आणि वडिलांसह दोन तरुण मुलांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गाव..

.शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून नव्या विहिरीचे काम सुरू होते. 

तब्बल ५० फूट खोदकाम पूर्ण झाल्यानंतर विहिरीला पाणीही लागलं होतं. त्यामुळे काकडे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं.मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही...

सोमवारी सकाळी विहिरीत साचलेलं पाणी काढण्यासाठी बाजीराव काकडे आपल्या दोन मुलांसह विहिरीत उतरले.

२६ वर्षीय आजिनाथ काकडे आणि २२ वर्षीय शाम काकडे हे दोघेही वडिलांसोबत काम करत होते.

काम सुरू असतानाच अचानक विहिरीचा कठडा आणि बाजूची माती मोठ्या प्रमाणात कोसळली...

क्षणातच मातीचा प्रचंड ढिगारा तिघांच्या अंगावर पडला आणि ते 50 फूट खोल विहिरीत दबले गेले.. 

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.माती उपसून तिघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

मात्र ढिगारा मोठा असल्याने बचावकार्याला अडथळे निर्माण झाले.यानंतर पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली.

पण दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.एकाच कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धानोरा गावात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत.विहिरीला पाणी लागल्याचा आनंद साजराकरण्याआधीच काकडे कुटुंबावर काळाने घाला घातला...

आणि आनंदाचं रूपांतर क्षणात दुःखात झालं.ज्या विहिरीला पाणी लागल्यामुळे काकडे कुटुंब आनंदात होतं... त्याच विहिरीने आज त्या कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा जीव घेतला आहे. 

सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली आहे.