तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरी आवडीने पनीर खाताय का? तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. देशातील बाजारपेठेत फोफावलेल्या 'कृत्रिम पनीर' वर केंद्र सरकार लवकरच कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि केंद्र सरकार यांच्यातील एका उच्चस्तरीय बैठकीत कृत्रिम पनीरच्या विक्रीवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ग्राहकांची होणारी आर्थिक फसवणूक आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, ही यामागची मुख्य कारणे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम पनीर हे केवळ अन्नाची गरज भागवते, पण शरीराला आतून पोखरते.
नैसर्गिक पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असते. कृत्रिम पनीरमध्ये ही मूल्ये शून्य किंवा नगण्य असतात.
हे पनीर बनवताना वापरलेली रसायने पचायला जड असतात, ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होतो.
कृत्रिम पनीरमध्ये अनेकदा निकृष्ट दर्जाचे 'व्हेजिटेबल ऑईल' वापरले जाते, ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.
यातील भेसळयुक्त रसायनांमुळे शरीरातील गाळण संस्था निकामी होण्याची शक्यता असते.हे कृत्रिम पनीर दिसायला, चवीला आणि स्पर्शाला अगदी खऱ्या पनीरसारखेच असते. त्यामुळे सामान्य ग्राहकाला उघड्या डोळ्यांनी फरक ओळखणे अशक्य होते. सध्या देशात सुमारे १,००० कंपन्यांकडे असे पनीर बनवण्याचा परवाना आहे, ज्यावर आता टांगती तलवार आहे.
राजस्थानमधील धौलपूर येथील न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. बनावट दूध बनवणाऱ्या ९ गुन्हेगारांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ग्राहक म्हणून तुम्ही काय काळजी घ्यावी? तर
नेहमी विश्वसनीय आणि अधिकृत परवाना असलेल्या दुकानातूनच दुग्धजन्य पदार्थ खरेदी करा.
पनीर पाकिटावर FSSAI चा लोगो आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा.
पनीरचा वास खूप उग्र येत असेल किंवा रंग प्रमाणाबाहेर पांढरा शुभ्र असेल, तर ते संशयास्पद असू शकते.
पनीरचा छोटा तुकडा गरम पाण्यात उकळा आणि त्यावर आयोडीनचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला, तर समजा त्यात स्टार्चची भेसळ आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या पनीरपासून दूर राहा आणि नैसर्गिक आहाराला प्राधान्य द्या