व्यंकटेश चपळगावकर स्मृतीप्रित्यर्थ यंदा मिलिंद खांडेकर यांचे व्याख्यान - टॉप न्यूज मराठी

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारे व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यान येत्या शनिवारी १६ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ, नवी पेठ येथे संपन्न होणार आहे. ‘तक चॅनल्स’, इंडिया टुडे ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर ‘एआय क्रांती : पत्रकारिता बहरेल की ओसरेल?’ या विषयावर आपले विचार मांडतील. 

मिलिंद खाडेकर हे भारतीय टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. 

११९९२ – ९३ मध्ये  नवभारत टाइम्समध्ये त्यांनी पत्रकारिता सुरु केली. सध्या इंडिया टुडे ग्रुपच्या 'तक चॅनेल्स' चे व्यवस्थापकीय संपादक आहेत. 'तक चॅनेल्स' हे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सपैकी एक असून त्याअंतर्गत मराठीतील 'मुंबई तक' सारखे अनेक प्रादेशिक उपक्रमही राबवले जातात. न्यूज तकवर 'साप्ताहिक सभा' नावाचा एक राजकीय कार्यक्रमही खांडेकर सादर करतात. 

'तक चॅनेल्स'मध्ये येण्यापूर्वी खांडेकर यांनी बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक म्हणून काम पहिले आहे.  भारतात बीबीसी आणि त्यांच्या भारतीय भाषा सेवेची व्याप्ती वाढवण्यात खांडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एबीपी न्यूज नेटवर्कचे (पूर्वीचे स्टार न्यूज) टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात, त्यांचा विस्तार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मराठीतील 'एबीपी माझा' आणि बंगालीतील 'एबीपी आनंदा' यांचा त्यात समावेश आहे.

मिलिंद खांडेकर हे जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या 'साल्झबर्गर एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्राम' चे फेलो होते. लिंक्डइनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'हिसाब किताब' नावाचा आपला साप्ताहिक ब्लॉगही ते लिहितात. या ब्लॉगमध्ये एआय सह व्यवसायातील ट्रेंड्सवर आपले विचार मांडतात.

लोकसभेची २००९ मधील निवडणुक कव्हर करत असताना एबीपी माझाचे पुण्यातील निर्भीड आणि धाडसी पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अर्नब गोस्वामी, सिद्धार्थ वरदराजन, जय देशमुख, राजदीप सरदेसाई, नीरजा चौधरी, कुमार केतकर, गिरीश कुबेर, धन्या राजेन्द्रन अशा अनेक पत्रकारांनी या व्याख्यानात विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत.