दिवसा मोलमजुरी, रात्री अभ्यास ‎ ‎नांदेडच्या संजय चापलवाड त्यांच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी ‎ - टॉप न्यूज मराठी

‎परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते,"

 हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय नांदेडच्या एका तरुणानं. ज्या हातांनी एकेकाळी उन्हात दगड फोडले, 

त्याच हातांनी आज खाकी वर्दीचा सन्मान मिळवलाय. दुपारपर्यंत हातामध्ये हातोडा आणि दुपारनंतर शाळेचं दप्तर...

 हा थक्क करणारा प्रवास आहे, संजय चापलवाड यांचा.

‎

‎

‎नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव. एका अत्यंत सामान्य आणि भूमिहीन कुटुंबात संजयचा जन्म झाला.

 घरची परिस्थिती इतकी हलाखीची की, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे दगड फोडणे. 

आई-वडिलांना मदत करण्यासाठी लहानग्या संजयने खेळण्या-बागडण्याच्या वयातच हातोडा हातात धरला.सकाळपासून दुपारपर्यंत तो रणरणत्या उन्हात आई-वडिलांसोबत दगड फोडायचा.

 घामाच्या धारा वाहत असतानाही, त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. दुपारनंतर, शरीराचा थकवा विसरून तो जिल्हा परिषदेच्या शाळेत धावायचा.

 'दगड फोडणारा मुलगा' ही ओळख पुसून 'अधिकारी' बनण्याचं स्वप्न त्याने तिथेच पाहिलं.२००९ मध्ये बारावी पूर्ण केल्यावर, संजयने २०१२ मध्ये पोलीस भरतीसाठी नांदेड गाठले.

 जिद्द इतकी होती की, पहिल्याच प्रयत्नात तो 'पोलीस शिपाई' म्हणून नियुक्त झाला. नोकरी लागली, गरिबी थोडी कमी झाली, पण संजयचं ध्येय अजून मोठं होतं. पोलीस दलात कर्तव्य बजावत असतानाच 

त्याने एमपीएससीचा (MPSC) अभ्यास सुरू ठेवला. दंगल नियंत्रण पथक, नक्षल विरोधी पथक अशा कठीण ठिकाणी काम करतानाही, 

त्याने अभ्यासाचे पुस्तक कधीच खाली ठेवले नाही.तब्बल १३ वर्षांचा शिपाई म्हणून अनुभव गाठीशी असताना, संजयने नुकत्याच लागलेल्या निकालात इतिहास घडवला.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात २५० व्या क्रमांकावर झेप घेत, तो 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) पदावर विराजमान झाला. 

एका मजुराचा मुलगा आज पोलीस दलात थेट अधिकारी झाला आहे. हा क्षण फक्त संजयसाठी नाही, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण  ठरला.

‎