नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
आपल्या मामाकडे सुट्ट्यांसाठी आलेल्या एका ११ वर्षीय चिमुरड्याचे राहत्या घरातून अपहरण झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे ही घटना घडली असून, वेदांत मनोज महाजन असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे.
या प्रकरणाने पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं असून नेमकं अपहरण कोणी आणि का केलं? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव... जिथे सध्या भीती आणि चिंतेचं सावट पसरलं आहे. वेदांत मनोज महाजन, वय वर्षे ११...
हा मुलगा आपले मामा देविदास हरिदास कुणगर यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. निमगाव येथील मेंढ्यांचा वाडा परिसरात मामाचं घर आहे.
खेळण्या-बागडण्याच्या वयात आणि मामाच्या घरी सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच, काळाने आणि काही अज्ञात नराधमांनी वेदांतवर घाला घातला.
राहत्या घराच्या परिसरातूनच वेदांतचे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरवस्तीतून अशा प्रकारे एका लहान मुलाचे अपहरण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे.