भारतीय विवाह सोहळे म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अवाढव्य खर्च, मान-पान आणि आहेराची देवाणघेवाण. मात्र, नाशिकच्या मनमाडमधील एका कुटुंबाने या रुढ परंपरेला फाटा देत एक नवा आदर्श घालून दिला आहे. लग्नात आलेल्या वऱ्हाडींना कोणतीही भौतिक वस्तू न देता, चक्क भारताचे संविधान भेट देऊन या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. नेमका काय आहे हा अभिनव उपक्रम आणि त्यामागची भूमिका,
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. ग्रामसेवक सुभाष गवई आणि विद्या गवई यांची कन्या 'ऋतुजा' आणि 'सोमेश चव्हाण' यांचा हा विवाह. दिसायला हा विवाह सोहळा इतर लग्नांसारखाच असला, तरी यातील एका कृतीने या सोहळ्याला विशेष उंचीवर नेऊन ठेवलं आहे. साधारणपणे लग्नात पाहुण्यांना मिठाई, भांडी किंवा इतर वस्तू भेट दिल्या जातात. पण गवई परिवाराने आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात 'संविधानाची मूल्ये' पोहोचवण्याचा निर्धार केला. लग्नाला आलेल्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळीला 'भारतीय संविधानाची प्रत' सन्मानपूर्वक भेट देण्यात आली संविधानामुळे आपल्याला जगण्याचे अधिकार मिळाले, त्यामुळे त्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला, विशेषतः ग्रामीण भागातील बांधवांना कळावे, हा यामागचा मुख्य हेतू. "लग्नाचा आनंद हा केवळ जेवणापुरता मर्यादित न राहता, तो वैचारिक असावा," अशी भावना गवई कुटुंबाने व्यक्त केली आहे.शिक्षण आणि समाज प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या या उपक्रमाचे सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. वऱ्हाडींनी देखील या 'रिटर्न गिफ्ट'चे स्वागत करत, हा आयुष्यातील सर्वात अनमोल आहेर असल्याचे म्हटले आहे.