राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर शाईफेक; जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप - टॉप न्यूज मराठी

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत वैचारिक वादातून एका राजकीय नेत्यावर शाईफेक करण्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर आळंदी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. 

या प्रकरणी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या १०-१५ समर्थकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवंडे हे पुण्यातील हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची वाडी येथे एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

 रात्री १० च्या सुमारास कार्यक्रम संपवून ते आपल्या खाजगी वाहनाने पुण्याकडे परतत असताना, हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली.

गाडी अडवल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना बाहेर खेचले आणि त्यांच्या अंगावर रासायनिक शाई ओतली. या झटापटीत लवंडे यांना धक्काबुक्की करण्यात आली. 

लवंडे यांनी असा आरोप केला आहे की, हल्लेखोरांकडे पिस्तूल होते आणि त्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. 

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यात संग्राम भंडारे स्वतः शाई फेकताना दिसत आहेत.

हल्ल्याचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायातील 'काही' प्रवृत्तींवर टीका केली होती. 

"संप्रदायात काही घुसखोर शिरले आहेत," असे विधान त्यांनी केले होते. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थकांचा उल्लेख केला होता. 

या विधानाचा राग मनात धरूनच हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.