अपंग तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पौड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; अवघ्या काही दिवसांत आरोपी जेरबंद - टॉप न्यूज मराठी

दिनांक २३/०४/२०२६ रोजी दुपारी १३:३० वाजण्याच्या सुमारास, मांडवखडक (ता. मुळशी) येथील पीडित तरुणी (वय १९ वर्षे ११ महिने) ही घरात एकटी असल्याचे पाहून, शेजारी राहणाऱ्या गजानन भागू पवार याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२९/२०२६, बी.एन.एस. कलम ६४, ६४(१), ६४(२)(i)(k), ३५१ अन्वये दि. ०१/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​पोलीस कारवाई:

गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितेची शारीरिक व मानसिक स्थिती लक्षात घेऊन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. आरोपी हा कातकरी समाजाचा असून डोंगराळ भागात राहणारा असल्याने त्याला शोधणे मोठे आव्हान होते. श्री. गिरीगोसावी यांनी सपोनी कदम, पो.हवा. रॉकी देवकाते, पो.हवा. निवास जगदाळे , पो हवा वैभव सुरवसे आणि पो.शि. नवनाथ शिंदे यांची तपास पथके तयार करून आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले.

​आरोपीचे नातेवाईक आणि तो काम करत असलेली ठिकाणे यांची माहिती काढत असतानाच, आज दि. ०७/०५/२०२६ रोजी आरोपी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवनानगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

​अशी केली अटक:

माहिती मिळताच सपोनी सुधीर कदम, पो.हवा. रॉकी देवकाते, पो.हवा. सिद्धेश पाटील , पो.हवा. जगदाळे , पो हवा सुरवसे आणि पो.शि. शिंदे यांनी खासगी वाहनाने पवनानगर गाठले. लोणावळा ग्रामीण (पवनानगर चौकी) येथील पो.हवा. नवनाथ चपटे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी गजानन भागू पवार (वय २६, रा. मांडवखडक वेगरे, ता. मुळशी) याला ताब्यात घेण्यात आले.

​सदर आरोपीला आज रोजी रीतसर अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई पौड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

​"महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील असून अशा गुन्ह्यांतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोंगराळ भागात शोध घेऊन पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे."

असं पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितलं