पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारांचा राडा भर रस्त्यात कोयत्याने वार करून, डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तरुणाचा खून - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील आंबेगाव पठार भागात काल रात्री काळजाचा थरकाप उडवणारी खुनाची घटना घडली. एक 18 वर्षीय तरुणाला टोळक्याने गाठलं, महिनाभरापूर्वी झालेल्या वादाचा मुद्दा काढला. तू शिवी का दिली ? तू चापट का मारली? असं म्हणत तरुणावर कोयत्याने वार केले. सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात घातला आणि हा तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही त्याच्यावर हे आरोपी वार करतच राहिले. ही घटना रस्त्याच्या कडेलाच घडल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीच वातावरण निर्माण झालं होतं. बघ्यांची गर्दी झाली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची खबर मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला. 

नयन सचिन जाधव असं मृत्यू झालेल्या अठरा वर्षीय तरुणाचं नाव आहे. आंबेगाव पठार भागातील निलगिरी चौकात रात्री सव्वानऊ वाजता त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवून पंचनामा केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला. हे आरोपी सातारा रोड परिसरात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्र हलवली. व आरोपींचा शोध लावला. दरम्यान या प्रकरणी सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून चारही तरुण अल्पवयीन आहेत. याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.