सत्तेला प्रश्न विचारणारी एक निर्भीड लेखणी शांत ! ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे निधन - टॉप न्यूज मराठी

 महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत अभ्यासू, निर्भीड आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे शनिवारी रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

विशेष म्हणजे, आज ३ मे रोजी त्यांचा वाढदिवस होता, 

मात्र वाढदिवसाच्या काही तास आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.

अभय मोकाशी यांची पत्रकारिता ही नेहमीच सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारी ठरली. 

१९८० च्या दशकात त्यांनी उघडकीस आणलेल्या गुणवाढ प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. 

त्यांच्या या शोधपत्रकारितेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 ही घटना भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात मैलाचा दगड मानली जाते. मुख्यमंत्र्यांची खुर्ची हादरवण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती, हे त्यांनी आपल्या कारकिर्दीतून सिद्ध केले होते.

केवळ राजकीय घडामोडीच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवरही त्यांचा मोठा हातखंडा होता. १९९० च्या दशकात मुंबईत गाजलेले 'किडनी रॅकेट' उघडकीस आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 

त्यांनी 'मिड-डे', 'फ्री प्रेस जर्नल' आणि 'इंडियन एक्सप्रेस' यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले.

 केवळ बातमीदारी करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन'मध्ये अनेक वर्षे अध्यापन करून पत्रकारांची नवी पिढी घडवली.

त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रातील एक 'अभ्यासू विद्यापीठ' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मागील वर्षीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या होत्या. 

बोरिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.